बीडमध्ये आमदार विनायक मेटे समर्थकाची डॉक्टरला बेदम मारहाण

बीड : पोलीसनामा ऑनलाईन- रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार विनायक मेटे यांचे नाव टाकले नसल्याच्या कारणावरुन मेटे यांच्या समर्थकाने डॉक्टराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा प्रकार रविवारी घडला असून एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सोमनाथ विष्णू पाखरे (२६, रा. अंकुशनगर) असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांना शहरातील नगर नाका येथे दाताचा दवाखाना सुरु करायचा आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी उद्घाटन सोहळा ठेवला आहे. निमंत्रण पत्रिकेत त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांची नावे टाकली. आमदार विनायक मेटे यांचे नाव का टाकले नाही? या कारणावरुन डॉ. पाखरे यांना बसस्थानकामागील एका बॅनर बनविण्याच्या दुकानात राहुल आघाव (रा. अंकुशनगर) याने बेदम मारहाण केली. दवाखाना कसा काय चालवतो? ते पाहतो अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. डॉ. पाखरे यांनी रविवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन राहुल आघाववर गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोहेकॉ सी.पी. वळवी करत आहेत.

डॉ. पाखरे यांना मेटे समर्थक राहुल आघाव मारहाण करीत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाखरे यांनी हा व्हिडीओ पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या व्हिडीओत डॉ.पाखरे हात जोडत आहेत तर राहुल आघाव हा त्यांना खुर्चीवर बसून मारहाण करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.