पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हैराण करणारा निर्णय, ‘कोरोना’ टेस्टचे खेळाडूंकडे मागितले पैसे

कराची : पोलीसनामा ऑनलाइन –   करोनाचे संकट असताना देखील अनेक देशांनी विविध क्रीडा स्पर्धांना परवानगी दिलीय. या स्पर्धेच्या आयोजन आणि यातील खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित क्रीडा संघटनेला घ्यावी लागते, असे असतानाही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने एक हैराण करणारा निर्णय घेतलाय.

पाकिस्तान देशात या महिन्याच्या अखेरीस नॅशनल टी-20 चॅम्पियनशिप सुरु होणार असून या स्पर्धेत खेळणारे खेळाडू, अधिकारी आणि अन्य लोकांना करोना विषाणूची लागण आहे की नाही याची चाचणी करावी लागणार आहे. या सर्वांना म्हणजे 240 जणांना पीसीबीने करोना चाचणीचे पैसे देण्यास सांगितलंय.

पाकिस्ता क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी आणि मुल्तान येथे 30 सप्टेंबर 2020 रोजी सुरू होणार्‍या स्पर्धेच्या अगोदर सर्वांची दोन करोना चाचणी नेगेटिव्ह असणे बंधनकारक केलंय. यातील पहिल्या चाचणीचे पैसे पीआयबी देणार असून तर दुसर्‍या चाचणीचे पैसे खेळाडू आणि अधिकारी यांना द्यावे लागणार आहेत.

नॅशनल टी-20 चॅम्पयिनशिप स्पर्धा झाल्यानंतर पाकिस्तान सुपर लिग स्पर्धा अर्थात पीएसएलमधील उर्वरीत सामने होणार आहेत. या स्पर्धेत काही विदेशी खेळाडू देखील असणार आहेत. तेव्हा देखील पाकिस्तान बोर्ड खेळाडूंकडून करोना चाचणीचे पैसे घेणार का? असा सवाल देखील विचारला जातोय. पाकिस्तान देशाचा संघ इंग्लंड दौर्‍यावर गेला होता. तेव्हा या संघात 42 जण होते. या सर्वांच्या करोना विषाणू चाचणीचे पैसे बोर्डाने दिले होते.