काय सांगता ! होय, भिकार्‍यानं चक्क 100 कुटुंबांना दिलं एक महिन्याचं ‘रेशन’, वाटले 3000 ‘मास्क’

पठाणकोट : वृत्तसंस्था – देशात असे बरेच लोक आहेत जे भीक मागून आपले पोट भरतात. पण पंजाबमधील पठाणकोट येथील एक भिकारी असा आहे जो कोरोना योद्धा बनून समोर आला आहे. भीक मागून जगणाऱ्या दिव्यांग राजूने असा एक आदर्श सर्वासमोर ठेवला आहे की तो कधीच विसरता येणार नाही. राजूने आतापर्यंत 100 गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन दिले आहे. एवढेच नाही तर त्याने 3000 मास्कचे वाटप केले आहे.

राजू तीन चाकाच्या सायकलवर फिरतो. दिवसभर तो भीक मागतो. मिळालेल्या पैशातून तो लोकांची मदत करतो. राजूने भीक मागून अनेक गरीब मुलींची लग्न लावून दिली आहेत. राजूने सांगितले, दिवसभरात जेवढे पैसे मिळतात त्यापैकी तो आवश्यकतेनुसार खर्च करतो. आणि उरलेल्या पैशांची बचत करून त्यातून गरजू लोकांची मदत करतो.

पठाणकोटच्या धनगु रोडवरील एका गल्लीकडे जाणारा पुल तुटला होता. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता. लोकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार केली. पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर राजूने त्याला भीक मागून मिळणाऱ्या पैशातून हा पुल दुरुस्त केला. त्याच्या या कामाची चर्चा संपूर्ण पंजाबमध्ये झाली होती.

राजूला त्याच्या जवळच्या लोकांनी दूर केले, याचे त्याला फार वाईट वाटते. म्हणूनच चागंले काम केले तर शेवटच्या क्षणी मला खांदा देण्यासाठी लोक जमतील. नाही तरी भिकारी जमिनीवर राहतात आणि जमिनीवरच त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी देखील कोणी पुढे येत नाही.
एवढ्यावरच राजू थांबला नाही तर त्याने भीक मागून जमलेल्या पैशातून गरीब मुलांच्या शाळेची फी भरतो. आतापर्यंत त्याने 22 गरीब मुलींचे लग्न लावून दिले आहे. तो भंडारा करतो, उन्हाळ्यात लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करतो. कोरोना विषाणूमुळे जेथे सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी झाली आहे, ते काम राजू भिकारी करत आहे. हे कोणालाही कधीही विसरता येणार नाही.