Bhiwandi : 14 वर्षीय बहिणीसोबत प्रेम करणार्‍या 16 वर्षाच्या प्रेमवीराला ‘सैराट’ स्टाईलनं संपवलं

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – 14 वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत प्रेम करणाऱ्या 16 वर्षीय प्रेमवीराची भावाने धारधार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली आहे. सैराट या मराठी चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच ही क्रूर हत्याकांडांची घटना मुंबईजवळील भिवंडी तालुक्यातील दापोडा-गुंदवली रस्त्यालगतच्या निर्जन ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अजय रामकरण यादव (वय – 20) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलाचे वडील लालजी यादव यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय यादव आणि फिर्यादी लालाजी यादव हे जवळचे नातेवाईक असून उत्तर प्रदेशातील एका गावात ते शेजारी – शेजारी राहतात. फिर्यादीचा 16 वर्षीय मृतक मुलगा हा सहा महिन्यांपूर्वी गावी गेला होता. त्यावेळी तो 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यावर मूळ गावीच दोन्ही कुटुंबामध्ये चांगलाच वाद झाला होता. या भांडणाचा आणि बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधांचा राग अजय यादव याच्या डोक्यात होता. या घटनेला काही महिने लोटल्यानंतरही अजयच्या डोके काही शांत झाले नव्हते. त्यामुळे त्याने मृतक मुलगा काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला दापोडा-गुंदवली येथील निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात 28 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे यांनी आरोपी अजय रामकरण यादव याला नालासोपारा मधील एका घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.