मोठी कारवाई ! शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसापुर्वी पोलिसनामा ने ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात या अशायाची बातमी प्रकाशित केली होती. याच बातमीची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. आणि आज शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती या ठिकाणी एका इमारतीमध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत अवैध्यरित्या साठविलेला गुटखा साठा सह तीन वाहने जप्त केली आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण रोड मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीच्या आतमध्ये तीन खोल्यांमध्ये काही अवैध्यरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे यांसह आदींनी त्या ठिकाणी जात छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन वाहने तसेच इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला, तर त्या ठिकाणी अंदाजे वीस लाख ते तीस लाख रुपयांचा गुटखा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, मात्र या ठिकाणी किती दिवसांपासून गुटखा साठविला जात आहे ? सदर गुटखा कोठून येत आहे ? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

या विषयी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी सांगितले की गुप्त बातमीदारा मार्फत या ठिकाणी गुटखा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही याठिकाणी येऊन छापा टाकला असता येथे मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला असुन याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिलेली आहे तसेच मिळून आलेल्या गुटख्याचे मोजमाप सुरु आहे.

माञ शिक्रापूर मधील ज्या ठिकाणी हा गुटखा आढळून आला त्या इमारतीला असलेली सीसीटीव्ही सुविधा व संरक्षण पाहता. या इमारतीमध्ये गुटखा ठेवला आहे कि सोन असा प्रश्न नागरिकांना पडला शिवाय राहणार नाही. येथे इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा येत असताना देखील इतके दिवस प्रशासनाला काहीच माहिती कशी नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिक्रापूर पोलिसांनी गुटखा साठ्यावर केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. पण आता शिक्रापूर पोलीस परिसरात होणाऱ्या इतर गुटखा विक्रीवर कारवाई करणार कि एक कारवाई करून नवीन वरिष्ठांकडून पाठ थोपटून गप्प बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.