बडया काँग्रेस नेत्याची जोरदार बॅटिंग, म्हणाले – ‘PM मोदींना सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान हवेत’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टिका विरोधक करत आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील कोरोना संकटात पंतप्रधान कार्यालय काहीच कामाचे नाही. सध्याची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदीवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोनामुळे देशात अनेकांचा जीव गेला. मात्र पंतप्रधान मोदींना त्याचे काही सोयरसुतक नाही. नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते, असे पटोले यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने दुस-या लाटेकडे दुर्लक्ष केले. उलट कोरोना संपला असे सांगण्यात आले. त्याचे परिणाम काय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिले अशी टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोना लसीच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी 10 कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला. त्यावरुन नाना पटोले यांनी टोला लगावला. मोदींसमोर नितीन गडकरींचे चालत की नाही ठाऊक नाही. पण आम्हाला वाटते की गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. देशात कोरोनाने कोट्यवधी लोकांचा जीव जात आहे. मात्र मोदींना त्याच काहू सोयरसुतक नाही, अशी टीका पटोलेंनी केली. मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरु आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे. मी गडकरी यांच्याविरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मते मागितली होती. त्यामुळे मला आनंद वाटतो, असे पटोले म्हणाले. कोरोनाने अनेकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला. शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट देऊ असे मोदी म्हणाले होते. पण आता शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजल्याचे पटोले म्हणाले.