पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, अंतिम वर्षासाठी 50 गुणांची परीक्षा, वेळापत्रकही ठरलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळू घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा येत्या 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी शिकवण्यात आलेला अभ्यासक्रमावरच ही परीक्षा असेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी यांनी सांगितले.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी सुरु केली आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे स्वरूप निश्चित करण्यात आले. अंतिम वर्षाची परीक्षा तीन तासा ऐवजी आता दीड तासांची असणार आहे. विद्यापीठातर्फे जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत काही विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकले नाही तर उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष परीक्षा घेण्याची तयारी देखील विद्यापीठाने ठेवली आहे.

डॉ. उमराणी यांनी सांगितले की, सुरूवातीला शेवटच्या वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येता 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत होईल. तर 16 जुलै ते 31 जुलै या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये एका वाक्यात उत्तरे द्या, शॉर्ट नोट्स, एमसीक्यू अशा स्वरुपाचे प्रश्न असतील. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी वर्गात शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा घेतली जाईल.

अंतिम वर्षाच्या बॅकलॉगमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास 27 दिवस लागतात. परंतु, जुलै महिन्यात केवळ 50 गुणांची परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे एका दिवसात दोन किंवा तीन सत्रामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकी पंधरा दिवसांच्या कालावधीत बॅकलॉगची व नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, असे नियोजन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.