शिल्पा शिंदे नंतर बिग बॉस फेम अर्शी खानचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसामध्ये अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला होता. ईशा कोपीकरने भाजपात प्रवेश केल्यानंतर बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.तिच्या पाठोपाठ आता आणखी एक बिग बॉस फेम अभिनेत्रीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र काॅंग्रेसने अर्शीला मोठ्या पदाची ऑफर दिली आहे.

याबाबत माहिती देत अर्शी म्हणाली होय, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. व्हाईस प्रेसिडेंट पदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात येणार आहे. खुलेपणाने आपले मत व्यक्त करत, अशा तरुणांचे सध्या पक्षाला गरज असल्याचे अर्शीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुद्धा तिने काँग्रेस प्रवेशाबाबत माहिती दिली आहे.

अर्शी खान ही मूळ भोपाळची आहे. बिग बॉस ११ मधून अर्शी खान प्रसिद्धी झोतात आली होती. अनेक वादग्रस्त प्रकरणात अर्शीचे नाव समोर आले होते. काही दिवसापूर्वी बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे आणि अभिनेत्री आसावरी जोशी यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.