काय सांगता ! होय, नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा, बँकेला तब्बल 8000 कोटींचा गंडा घालणार्‍या माजी खासदाराविरूध्द FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने टीडीपीचे (तेलुगू देशम) माजी लोकसभा सदस्य रायपती संभाशिव राव आणि त्यांच्या हैदराबाद येथील कंपनीविरोधात सुमारे ८००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देशातील हा सर्वांत मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असल्याचं सांगितलं जातं.

कॅनरा बँकेच्या नेतृत्त्वाखालील कन्सोर्टियमला फसवल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा घोटाळा नीरव मोदीच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा असू शकतो. बँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाची रक्कम वळवण्यात आली आहे. त्यामुळे कॅनरा बँक आणि इतर बँकांना७,९२६.०१ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. एवढी मोठी रक्कम आता एनपीए झाली आहे. शुक्रवारी सीबीआयने कंपनीच्या परिसरात छापेमारी केली होती. त्याचबरोबर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवरही धाड टाकण्यात आली होती.

संभाशिव राव हे पाचवेळा लोकसभा सदस्य होते. त्यापूर्वी ते राज्यसभा सदस्य होते. १९८२ मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी ते राज्यसभेत निवडून गेले होते. ते महाविद्यालयीन दिवसांपासून राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधींच्या काळात ते काँग्रेसच्या संपर्कात होते. सुरुवातीला ते सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर राज्यसभेवर गेले. गुंटूरमध्ये त्यांची जयलक्ष्मी ग्रूप ऑफ कंपनीही आहे.माजी खासदार रायपती संभाशिव राव हे ट्रान्सटॉय (इंडिया) लि.चे अतिरिक्त संचालक आहेत. त्यांच्याबरोबर इतर लोकांवर बनावट खाती आणि चुकीच्या नोंदी त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने निधी गोळा करणे आणि कन्सोर्टियला ७,९२६ कोटींचे कर्ज न फेडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कॅनरा बँकेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयने त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला आहे.

सीबीआयचे प्रवक्ते आरके गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या नेतृत्त्वाखाली इतर बँकांचा एक कन्सोर्टियम बनवण्यात आला होता. कंपनीने बँक अकाऊंटच्या खाते पुस्तकात फेरबदल केले. बॅलन्सशीटमध्ये बदल केले आणि चुकीच्या पद्धतीने निधी वितरित केला. या अफरातफरीमुळे बँकांचे मोठे नुकसान झाले आहे. सीबीआयच्या मते नीरव मोदीने ६००० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तर मेहुल चोकसीने ७,०८०. ८६ कोटींचा घोटाळा केला आहे. या दोघांपेक्षाही हा सर्वात मोठा घोटाळा सिद्ध होऊ शकतो.