बिहार विधानसभा : एनडीए आणि महाआघाडीत काँटे की टक्कर

बिहार : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, एनडीएने (NDA) ३ जागांवर विजय मिळवला आहे. जदयुने ((JDU) एका जागेवर आणि भाजपने २ जागांवर विजय प्राप्त केला आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने २ जागा जिंकल्या आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतदान मोजणीस सुरुवात झाल्यापासून एनडीए आणि महाआघाडीत काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे.

दरभंगातील केवटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरारी झा यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दीकी यांना पराभूत करत विजय मिळवला आहे. दरम्यान, सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठे लीड घेतले होते. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीएचा आकडा वाढू लागला आहे. आता २४३ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

सध्या एनडीएने १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात भाजप ७३, जदयू ४७ तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आहेत. बहुमतासाठी लागत असलेला १२२ जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे, तर महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामध्ये राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत. समोर येणारे आकडे पाहता जदयू बिहारमध्ये लहान भावाची भूमिका पार पाडणार असे दिसत आहे. तर भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याने नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.