Bihar Election 2020 : बिहार निवडणुकीत गाजणार एकनाथ खडसेंचा मुद्दा, भाजपा ओबीसी विरोधी असल्याचे सांगणार

पाटणा : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राज्यातील भाजपावर अगामी काळात मोठे परिणाम दिसून येणार असले तरी सध्या देशातील राजकारणातही खडसे यांच्या प्रवेशाचा मुद्दा गाजवण्यासाठी विरोधकांनी तयारी केल्याचे दिसत आहे. बिहार निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भाजपामध्ये ओबीसी नेते असल्याने खडसे यांचा कसा छळ झाला, हे दाखवून भाजपविरोधी वातावरण तयार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

भाजपाने बिहार निवडणूकीची जबाबदारी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिली आहे. भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस सध्या सक्रिय आहेत. दरम्यान, भाजपा सोडताना एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केल्याने बिहार निवडणुकीत खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुद्दा उचलून धरण्याच्या तयारीत विरोधक आहेत.

याबाबत बिहारमधील आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी म्हटले की, 6 वर्षांपासून भाजपामध्ये एकनाथ खडसेंचा छळ सुरू होता, कारण ते ओबीसी समाजातील आहेत. खडसे यांनी भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. खडसे हे ओबीसी नेते आणि महाजन-मुंडे गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. महाजन-मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाला मोठी ताकद दिली, असे झा यांनी म्हटले आहे. झा यांनी दिलेले हे संकेत सांगत आहेत की, बिहारमध्ये खडसे यांचा चांगला गाजणार आहे. शिवाय भाजपा ओबीसीविरोधी असल्याचा प्रचार या मुद्द्याद्वारे विरोधकांकडून केला जाऊ शकतो.

एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर आता बिहारमध्ये विरोधी पक्ष हा मुद्दा जोरदार उचलून धरणार आहे. भाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाही असा प्रचार भाजपाच्या विरोधात केला जाणार आहे. ज्यांनी भाजपाला कष्ट करून मोठे केले आता पक्ष त्यांना बाजूला ठेवत आहे. या माध्यमातून बिहारमधील जुन्या नेत्यांच्या समर्थकांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांचा समावेश आहे ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.

महायुती निवडणूक सभा आणि जनसंपर्कातून भाजपाविरोधी प्रचार करणार आहे. एकनाथ खडसेंची सोडचिठ्ठी असो वा यशवंत सिन्हा, या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्या जातील असे राजदने म्हटले आहे. दरम्यान, विरोधकांच्या या प्रयत्नावर भाजपाने म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांच्या जाण्याने बिहार निवडणुकीत मोठा फरक पडणार नसून विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते गोष्टींकडे लक्ष वेधत आहेत.

You might also like