अल्पवयीन विद्यार्थीनीवर रेप आणि ब्लॅकमेलिंग करणार्‍या शिक्षकाला जन्मठेप

हाजीपुर : वृत्तसंस्था – बिहारामध्ये हाजीपुरच्या पॉस्को विशेष न्यायालयाने विद्यार्थीनीवर एक वर्षापर्यंत बलात्कार करणार्‍या वासनांध शिक्षकाला कठोर शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातील या आरोपी शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच शिक्षक आणि त्याच्या साथीदारांवर 1-1 लाखांचा दंड सुद्धा लावण्यात आला.

बलात्काराची ही घटना वैशाली जिल्ह्यातील महनार येथे घडली होती. येथे एका शाळेचा शिक्षक आणि त्याच्या मित्र एक वर्षापर्यंत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होते. हे दोघे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अश्लील व्हिडिओ बनवून विद्यार्थीनीला ब्लॅकमेल केले. वर्षभर छळ सहन केल्यानंतर विद्यार्थीनी डिप्रेशनला बळी पडली. यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

पोलिसांनुसार, मार्च 2019 मध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. महनारच्या पानापुर हरगोविंदपुरच्या सरकारी शाळेत पिंकी (काल्पनिक नाव) आठवीच्या वर्गात शिकत होती. शाळेतील शिक्षक अभिषेक आणि त्याच्या एका ड्रायव्हर मित्राने तिच्यावर वर्षभर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. आरोपी शिक्षकाने विद्यार्थीनीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आणि सातत्याने तिचे लैंगिक शोषण करत राहिला.

पीडित मुलीचे वडिल बिहारच्या बाहेर हैद्राबादमध्ये काम करत होते आणि मुलगी आपल्या आईसह एकटी घरी राहून शिकत होती. सतत होणार्‍या ब्लॅकमेलिंगने मुलगी डिप्रेशनला बळी पडली. सुमारे एक वर्षानंतर मुलीच्या वडिलांना संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली, ज्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पोलिसांनी तातडीने शिक्षक आणि त्याच्या मित्राला अटक केली.

हे प्रकरण पॉक्सोच्या विशेष न्यायालयात आणले गेले. येथे एडीजे आशुतोष कुमार झा यांनी आरोपी शिक्षकाला आणि त्याच्या मित्राला मरेपर्यंत जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षेसह दोघांवर 1-1 लाख रूपयांचा दंड सुद्धा लावला. तर, 12 वर्षाच्या वयात राक्षसी कृत्याला बळी पडलेल्या पीडितेला कोर्टाने 10 लाख रूपयांच्या भरपाईची सुद्धा घोषणा केली.