खळबळजनक ! बापानं मुलीच्या प्रियकराचं केलं अपहरण, दुकानात डांबून केला खून

समस्तीपूर :- बापानेच मुलीच्या प्रियकराचे अपहरण करून त्याची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. रोसडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालापर गावात मंगळवारी (दि. 17) रात्री उशिरा ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेली हत्यार जप्त केली आहेत.

रुदलकुमार उमेश दास (वय 18, रा. बालापूर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर दिनेश महतो असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. पंचायतीत हे प्रकरण गेले होते. मुलीच्या बापाने याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अनेकदा रुदलला दिली होती. घटनेच्या रात्री आरोपीने रुदल कुमारचे रात्रीच अपहरण केले होते. दिनेश महतो याने रुदलला आपल्या दुकानात नेले. तिथे नेऊन त्याचे हातपाय बांधून धारधार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या केली. हत्येच्या घटनेवेळी दिनेश महतोच्या पत्नीने त्याला बघितले. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्यावरही वार केले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.