PMAY ची तारीख मार्च 2021 पर्यंत वाढवली, वर्षाकाठी 6 ते 18 लाख उत्पन्न असणार्‍यांना फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सबसिडी लिंक होम लोन स्कीम प्रधानमंत्री आवास योजनेचा अवधी एक वर्षासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम ला सरकारने 2017 मध्ये लागू केले होते जी मार्च 2020 मध्ये संपली. आता त्याची तारीख मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6-18 लाखांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा फायदा होईल. गृहनिर्माण क्षेत्राला 70 हजार कोटी रुपये प्रोत्साहन देण्याची घोषणा त्यांनी केली. 2.5 लाख मध्यम उत्पन्न कुटुंबांना लाभ देण्यासाठी या योजनेला एक वर्षासाठी वाढविण्यात येणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजच्या दुसर्‍या हप्त्याच्या अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि स्थलांतरित कामगारांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यांनी 50 लाख फेरीवाल्यांसाठी कर्ज जाहीर केले आहे. यासाठी 5000 कोटींची खास क्रेडिट सुविधा दिली जाईल. सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी वर्किंग कॅपिटल सुमारे 10,000 रुपये मिळतील.

शेतकऱ्यांसाठी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) च्या माध्यमातून 30,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आपत्कालीन कार्य भांडवल निधी जाहीर केला. ग्रामीण सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या पीक कर्जाच्या आवश्यकतांसाठी नाबार्ड 30,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त पुनर्वित्त विस्तारित करेल. याचा फायदा 3 कोटी शेतकऱ्यांना होईल, यामध्ये मुख्यत: छोटे आणि सीमान्त शेतकरी असतील.