राज्यातील प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडवित नसल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड भाजपा करणार आकुर्डीत आंदोलन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महिला अत्याचाराचे वाढते प्रकार, गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि शेतकरी प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार गांर्भियाने प्रश्न सोडवित नाही, याच्या निषेधार्थ पिंपरी – चिंचवड शहर भाजपतर्फे मंगळवार (दि.२७) सकाळी ११ वाजता आकुर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी चिंचवडमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, महापाैर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमित गोरखे, उमा खापरे, शैला मोळके, सीमा सावळे, अमोल थोरात, बाबू नायर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले , “भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सता स्थापन केलेल्या शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी एकही आश्वासन पाळले नाही.

एकीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले असताना दुसरीकडे कर्जमाफी योजना म्हणून फसव्या योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही.

हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळन टाकणे अशा घटना वाटू लागल्यामुळे महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे”. असे लांडगे यांनी सांगितले .