पंढरपूर : भाजपचे आवताडे यांचा दणदणीत विजय

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो असे आवाहन केले होते. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकरांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्याआधी दुसऱ्या फेरीअखेरीस आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492 मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मत मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भगीरथ भालके यांना 8613 मत मिळाली. तर समाधान आवताडे यांना 7978 मते मिळाली. पण, त्यानंतर डाव पलटला. 7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला आहे.