पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवकाला मारहाण

पिंपरी – चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट जबरदस्तीने मिळवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने कंपनीत प्रवेश केला. या टोळक्याला विरोध करताना व्यवसायिक, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना मारहाण करण्यात आली असून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.२२) दुपारी तीनच्या सुमारास चाकण येथील सिस्का एलईडी कंपनीत घडली.

केशव हनुमंत घोळवे (वय 42, रा. शिवसुंदर हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शरद ज्ञानेश्वर मांडेकर (वय 23, रा. आंबेठाण, ता. खेड), मनोज ओवले, विशाल पाटील आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे महाळुंगे आंबेठाण रोडवर सिस्का एलईडी कंपनी आहे. या कंपनीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घोळवे सुरक्षा रक्षकांचा आढावा घेत होते. त्यावेळी शरद आणि त्यांचे पाच साथीदार कंपनीत जबरदस्तीने घुसले. कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच मिळायला हवे, असे म्हणत त्यांनी घोळवे, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी घोळवे यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी शरद मांडेकर याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात