नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये (BJP) गळती सुरू झाली आहे. भाजप नेेते आमदार गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील गडाला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला फटका बसला आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याआधी 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने भाजपला आणखी जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक घेऊन आमदार गणेश नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीने आता नाईकांच्या गडाला सुरुंग लावायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यातच भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे.