भाजप-मनसे जवळीक वाढतेय, राज ठाकरे-शेलार यांच्यात ‘गूप्तगू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारल्यानंतर आता मनसे भाजपची मनं जुळायला लागली आहेत असे दिसते. भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली. या दोन नेत्यात तासभर खलबतं झाली.

बुधवारी संध्याकाळी 7 वाजता अशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यात विविध विषयांवर चर्चा झाली. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देणारा असून भाजपचा याला अप्रत्यक्ष पाठिंबा असेल. त्याच अनुशंगाने दोन्ही नेत्यात चर्चा झाली.

यामुळे भाजपवर हल्लाबोल करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशिष शेलार यांच्या भेटीने महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलू शकते. मनसे राज्यात आपला नावा मित्र होऊ शकते असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे या भेटीगाठी चालू आहेत. 7 जानेवारीला प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक पार पडली. जवळपास 1 तास या नेत्यांत चर्चा सुरु होती. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचे जाहीरपणे स्वागत केले होते. ते म्हणाले की मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करणार असेल तर हे स्वागतार्ह आहे, आमच्या पक्षाची आणि मनसेची मते जुळली तर मनसेच काय अशा समविचारी कोणत्याही पक्षाशी मैत्री शक्य आहे.