भाजपच्या ‘या’ दिग्गजाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हरिश्चंद्रानं उध्दव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला, हे मिस्टर सत्यवादी सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  “हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारी साठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे,” असं म्हणत भातखळकर यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत, ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी चित्रा वाघ यांच्याबाबतही भाष्य केलं. “चित्रा वाघ ‘गब्रू प्रकरणी’ रोज सरकारची लाज काढतायत, त्यामुळे कागदी वाघानं त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावलं. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करतायत. काय लायकीची माणसं आहे ही? म्हणे हे विचारी आणि सुसंस्कृत,” असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत – राऊत

यावेळी भाजपाच्या महिला आघाडीकडून पूजा चव्हाण प्रकरणात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, की “पंतप्रधानांनी सांगितलं की आंदोलन करायचं नाही. मात्र महाराष्ट्रापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत.” “भाजपावाले ज्या विषयासंदर्भात ते आंदोलन करू इच्छितात त्या विषयात मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात नक्कीच न्याय करतील,” असा विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.