भाजप नेत्याचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले – ‘हा तर आदित्य ठाकरे यांचा डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीमुळे उपनगर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना त्रास होत असताना सुद्धा याबाबत जिल्हा नियोजन समितीची बैठक मागील वर्षापासून घेण्यात आली नव्हती, शेवटी ती बैठक गुरुवारी ता. २८ जानेवारी रोजी ऑनलाइन बैठक घेतली जाणार आहे. मात्र या बैठकीत उपनगर जिल्ह्यातील पुढील वर्षभरासाठीच्या विकासकामांचे नियोजन आणि आर्थिक आराखडा मंजूर केला जातो, अशी महत्त्वाची बैठक कमी वेळेत, कमी सूचनेत ऑनलाइन पद्धतीने घेऊन चर्चा न करताच पार पडण्याचा पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा डाव आहे. अशी घणाघाती टीका भाजपा मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची बैठक किमान तीन महिन्यात एकदा तरी होणे अपेक्षित असते, पण जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक वेळा सुद्धा बैठक घेऊन जिल्ह्यातील समस्या ऐकून घेण्याचे काम केले नाही. इतकेच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरात वर्षभर त्यांनी पाय सुद्धा टाकले नाही. ही उपनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक वर्षभरानंतर का होईना घेण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला असला तरी मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम ओन्ली’ चे अनुकरण करत हि बैठक ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचे ठरविले आहे अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पुढे भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे एक आग्रही मागणी केली आहे कि, जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन न घेता प्रत्यक्ष घेण्याची मागणी केली आहे. राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्यातील समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बहुतांश जिल्हा नियोजन बैठका प्रत्यक्ष पद्धतीनेच होत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ऑनलाइन बैठक न घेता मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. तसेच कोरोना असो किंवा अतिवृष्टी, मुंबईकरांना एका नव्या रुपयाची मदत सुद्धा न करणाऱ्या पालकमंत्र्यांनी किमान आता तरी उपनगरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावे अशी मागणी सुद्धा भातखळकर यांनी केली आहे.