भाजप आमदार म्हणतात, ‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झालेत, कोरोना आटोपल्यावरच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे शासन स्तरावरील बहुतांश निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशिवाय इतर मंत्री करत असतात. त्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुदा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील’ म्हटले आहे.

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येत आहे. याशिवाय आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधांचा तुटवडा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. ‘मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवार हे जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत?, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर अतुल भातखळकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

‘सध्या कोरोना कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात.’