शरद पवारांच्या दिल्ली भेटीनंतर खडसे उद्या ‘मातोश्री’वर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे उद्या मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे नाराज खडसे यांनी नवी दिल्लीत एकाही भाजप नेत्याची भेट न घेता मुंबईत परतत आहेत. खडसेंनी दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या मुलीला तिकीट दिले होते. निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्याची सल त्यांच्या मनात होतीच. त्यातच भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्याने त्यांनी त्यांची नाराजी अनेकवेळा उघडपणे बोलून दाखवली. आपल्या मनातील खदखद पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करण्यासाठी ते आज दिल्लीत गेले होते. मात्र, एकाही भाजपच्या नेत्याची भेट न घेता त्यांनी फक्त राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज लोकसभेत होते. मात्र राज्यसभा खासदार असलेले कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचीही खडसे यांनी भेट न घेता ते शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचे खडसे यांनी सांगितले. आता खडसे उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे खडसे-ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like