‘राजीनामा स्वतःहून दिला नाही तर वरिष्ठांचं नाव सांगितल्यानं कोर्‍या कागदावर सही केली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, ’राजीनामा स्वत:हून नव्हे तर, वरिष्ठांचं नाव सांगितल्याने कोर्‍या कागदावर सही केलीय.’

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता हा नवीन गौप्यस्फोट केलाय. स्वत:हून राजीनामा दिलेला नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे देशाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की, राजीनामा द्या. वरिष्ठांकडून आदेश आले आहेत, असे मला सांगितलं, त्यामुळं मी राजीनामा दिलाय, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ते एका वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, वरिष्ठांचे नाव सांगितल्याने मी कोर्‍या कागदावर सही केली होती. मी स्वत:हून राजीनामा दिला नाही. मात्र, पक्षानं मला असं सांगितलं होतं की, बाहेर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घ्याल त्यावेळी तुम्ही असं सांगा की, तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. स्वत:हून चौकशीची मागणी केलीय, असं सांगा, असं पक्षाकडून सांगण्यात आले होतं. मी त्यावेळी विचारले, माझी काही चूक नाही. पण, त्यांनी वरिष्ठांचं नाव सांगितल्यामुळं मी राजीनामा दिलाय.

खडसे पुढे म्हणाले, 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे 40 वर्षाच्या राजकीय जीवनात मी सांभाळलं. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. त्यांना राजीनामा द्या, असं म्हटलं नाही. मात्र, माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसर्‍या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. गृहविभागाची सगळी खाती तिकडं वळती केली. पदाचा दुरुपयोग केला, असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

मी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोधात बोलतोय, असं म्हणणं चुकीचं आहे. मी अन्याय झाला म्हणून बोललो. अनेकांवर अन्याय झालाय. माझ्या मुलीनं तिकीट मागितलं नसताना तिकिट दिलं. तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणार्‍या जागी तिकिटं दिली नाहीत, त्यामुळं जागा कमी आल्या, असंही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा आहे, त्यामुळं लोकांनी नाकारलं, असं खडसे म्हणाले.

’नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार
आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण, नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नुकतं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही, तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणाराय, असे खडसे म्हणाले होते. ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार आहे. तसेच त्यातून अनेक गोष्टी उघड करणार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता-जुळता कार्यक्रम आहे. यावेळच्या वाढदिवस सुनील नेवे यांच्या पुस्तकामुळे लक्षात राहील, मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र, त्यांच्या प्रेमाने लिहिलंय. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या पत्नीवरुन सोबत आरोप केलेत. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळालेत. ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणाराय. त्यात सगळे मी लिहिणाराय, असं खडसे म्हणाले होते.

… तर मग मला तिकीट का दिलं नाही?
भाजप नेत्यांनी मी चांगलं म्हटलंय. मग, मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न पडतोय. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतोय, असं खडसे म्हणाले होते. भाजपचा चेहरा-मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलंय. आज चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का? असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिलेय. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र वेगळं असते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत, अशी गोपीनाथ यांची भूमिका होती, असेही एकनाथ खडसे म्हणाले होते.