माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंचा संजय राऊत यांच्यावर ‘निशाणा’, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सामनामध्ये लिहलेल्या अग्रलेखावरुन सध्या राजकारण पेटले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून टीका टिपन्नी करण्यात येत आहे.

संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडें यांनी केले आहे. देशभरात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यासाठी सरकारकडूनही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण सध्या यावरूनही राजकारण तापताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाला गांभीर्य नसलेला पक्ष सामनाच्या अग्रलेखात उल्लेख केला होता. दंडुका पडल्याशिवाय भाजपचे डोके ठिकाणावर येणार नाही, असे संपादकीयमधून नमूद केले होते. यावरून आता भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.अनिल बोंडे यांनी ट्विटरवरून ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत? ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे.

काय म्हटलेले होते अग्रलेखात?
एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुंभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना काय झाले आहे? जणू जनतेची काळजी फक्त त्यांना आहे आणि सरकार फक्त हाती दंडुका घेऊन फिरत आहे. अशी विधाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आधीच्या राजवटीत पोलिसांचा फक्त गैरवापर सुरू होता. आज फक्त कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा वापर सुरू आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे.