‘आता कळलं का? API सचिन वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता‘

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपाचे नेते सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. मात्र, गृहमंत्री देशमुख यांनी या आरोपांचे खंडन करत परमबीर सिंग यांच्यावरच आरोप केले आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर नाराज असलेले परमबीर सिंग नवीन पदभार न घेताच रजेवर गेले असून स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

सोमय्यांनी सांगितले नोटा मोजण्याच्या मशीनचे कारण
काही दिवसांपूर्वी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या मर्सिडिज गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये काही नंबर प्लेट्स, पाच लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजण्याची मशीन आढळली होती. यावरून आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एक ट्विट करत तोंडसूख घेतले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता.

 

 

 

 

गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया
परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून स्पष्ट होत होती. यामुळे परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.

पत्रात शरद पवार, अजित पवार यांचाही उल्लेख
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मार्च महिन्याच्या मध्यावर वर्षा निवासस्थानी मी तुमची भेट घेतली. यावेळी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली. एवढेच नव्हे तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या इतर मंत्र्याना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचे निदर्शनास आले.

असे गोळा करा 100 कोटी
परमबीर सिंग यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावले आणि दरमहा 100 कोटी जमा करण्यास सांगितले. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितले. त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे कसे गोळा करायचे हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितले. मुंबईत 1750 बार आणि रेस्तराँ आहेत त्या प्रत्येकाकडून दोन-तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल.