पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या होणाऱ्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असून त्या पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी मी सर्व गोष्टींचा खुलासा करेल असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे भाजपवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ‘माधव’ अर्थात माळी, धनगर आणि वंजारी समाजाला एकत्र आणत राज्यात नवीन पॅटर्नला सुरुवात केली होती. आता माजी मंत्री पंकजा मुंडे या देखील राज्यात माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत या समुदायाला एकत्र आणून ‘माधवबरा’ या नव्या पॅटर्न नुसार मोर्चेबांधणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी देखील पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे आता उद्या भाजपमधील सर्व नाराज मंडळी एकत्र येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवाला भाजपच जबाबदार असल्याचे अनेक मुंडे समर्थकांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावरून भाजपच्या नावाचा आणि चिन्हाचा उल्लेख करणे देखील टाळले होते. मात्र यावर काही न बोलता आपण १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पंकजा मुंडे उद्या नेमका कोणता निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com