‘ज्या मुघलांना भाजपचे नेते शिव्या घालतात, त्याच मुघलांच्या काळात भारताचा GDP 25 % होता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. देशावर आर्थिक संकट ओढावलं असून देशाचा जीडीपी चार दशकांमध्ये पहिल्यांदाच प्रचंड घसरला आहे. सध्या जीडीपीच्या आकड्यांबाबतच सर्वत्र चर्चा सुरु आहे. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपाच दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून 23.9 टक्क्यांनी आक्रसल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच काँग्रेसचे सलमान निझामी यांनी तर मुघलांच्या काळात भारताची परिस्थिती अधिक चांगली होती असा टोला लगावला आहे.

सलमान निझामी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करताना म्हटले की, मुघलांच्या काळात जीडीपी 25 होता आणि आता पहा अशा अर्थाचे ट्विट केलं आहे. यावरुन सोशल नेटवर्किंगवर मोदी समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगली शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनंतर सलमान यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. भाजपचे नेते मुघलांना रोज शिव्या देतात. मात्र, खरे तर हे आहे की मुघलांच्या कालावधीमध्ये भारताचा जीडीपी 25 टक्के होता आणि आज वजा 23.9 टक्के इतका आहे. अकबराच्या काळात भारतीय लोकं अमेरिकन लोकांपेक्षा श्रीमंत होते. आज शेजारच्या बांगलादशची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहे, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

मुघलांच्या काळात जीडीपी 25 टक्के होता
सलमान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे की, भाजपचे नेते रात्रंदिवस मुघलांना शिव्या देतात. काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या देतात. नेहरुंना शिव्या देतात. मात्र मुघल काळात देशाचा जीडीपी 25 टक्के होता. जेव्हा अकबर भारतावर राज्य करत होता तेव्हा भारत हा अमेरिकेपेक्षा श्रीमंत होता. त्यानंतर भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती. त्यांनी भारताला लुटलं तरी त्या काळात भारताचा जीडीपी 4 टक्के होता. 25 वरुन जीडीपी 4 वर आला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसकडे सत्ता आली. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी मनमोहन सिंग यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केलं. त्यावेळी देशाचा जीडीपी 10 टक्यावरून 12 टक्क्यापर्यंत गेला होता.

भाजपच्या काळात जीडपी वाढलाच नाही
सलमान पुढे म्हणाले, मनमोहन सिंग यांच्यावर ते सतत गप्प असतात काही बोलत नाहीत असे आरोप झाले. त्यांच्या कालावधीत देशाचा जीडीपी 10 ते 12 टक्क्यांदरम्यान होता. रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त येतो अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे हे आहे. मनमोहन सिंग शांत असायचे कमी बोलायचे मात्र सर्वात चांगले पंतप्रधान होते. आता भाजपच्या काळात बघा. कोरोना असू द्या किंवा त्या आधीचे सहा वर्ष असू द्या. या कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांसमोर आहे. चार टक्क्यांच्यावर कधी जीडीपी वाढलाच नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मुघलांनी स्वत:चे पुतळे उभारले नाहीत
दुसऱ्या एका ट्विटमध्ये सलमान यांनी भारतामध्ये लोकप्रिय पर्यटनस्थलांमध्ये मुघलांच्या काळात बांधकाम करण्यात आलेली स्थळे अव्वल स्थानी असल्याचे सांगणारा लेख शेअर केला. त्याबरोबर त्यांनी मुघलांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी स्वत: पुतळे उभारले नाहीत. त्यांनी ताज महाल, लाल किल्ला यासारख्या गोष्टी उभारल्या. ज्या आजही पर्यटकांना आकर्षित करतात आणि सरकारी तिजोरीला अर्थिक हातभार लावतात. जे मुघलांना शिव्या घालतात त्यांना त्याचे गुजरात मॉडेल भिंतीमागे लपवावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.