MIM च्या त्या 2 आमदारांना त्वरीत अटक करा, भाजपची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेले लेटरहेड्स त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद अशी 2 दोन आमदारांची नावं आहेत.

कायमच बेकायदेशीर आणि देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएमचा (MIM) देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर यांनी ट्विटरवरून त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते म्हणतात, “एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटरहेड्सचा वापर करून मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह देशांतील विविध शहरांत राहणाऱ्या बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचं काम सर्रासपणे सुरू होतं. या टोळीकडे एमआयएमच्या आमदारांचे 7 कोरे लेटरहेड्स देखील मिळाले आहेत. हा प्रकार अतिशय घातक आणि धोकादायक आहे. त्यामुळं दोन्ही आमदारांना तातडीनं अटक करा.” अशी मागणीही त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणाचां गांभीर्य ओळखून याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.