‘मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटतं, खा. गिरीश बापटांचा टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, एका यु ट्यूब चॅनेलला मुलाखत देताना मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. अशातच मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असा टोला भाजप खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्यानंतर वार्ताहरांना बोलताना गिरीश बापट म्हणाले, “तुमच्या द्वारेच जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे ऐकत आहे. आता मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांना ठरवायचे आहे. मला विचाराल, तर मला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते,” असा चिमटा बापट यांनी काढला.

बैठकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं, केंद्र आणि राज्याचे काही समान प्रश्न आहेत. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही निर्णय घेता येईल, यावरती बैठकीत चर्चा झाली. रेल्वे सुरु करणे, केंद्राने राज्याला अधिकाधिक निधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील अपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. दर दोन ते तीन महिन्यांनी अशी बैठक झाली, तर प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असेही बापट म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी बैठकीत चर्चा झाली असून, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाप्रश्नी सर्व खासदारांनी साथ देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे बापट यांनी सांगितले.