‘जे परीक्षेलाच बसले नाहीत, त्यांना कोण Certificate देणार ?’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणणा-या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे (bjp-mp-narayan-rane) यांनी आज जोरदार टीका केली आहे. जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत. त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav-thackeray) यांना लगावला आहे.

पालघरमधील साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्यावा, या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘जन आक्रोश यात्रा’ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यात्रेला परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतले व सोडून दिले. कदम यांच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नारायण राणे यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची विचारसरणी नाही. ते तडजोड करणारे आणि पदासाठी हवे ते करणारे आहेत. शिवसेना व हिंदुत्व हे समीकरण जुळणार नाही, असे राणे म्हणाले. भाजपशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून बसले, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता केला, तिथेच त्यांनी हिंदुत्व सोडलं. सर्वधर्म समभाववाल्यांसोबत गेलेल्यांकडून साधूसंतांच्या रक्षणाची अपेक्षा यांच्याकडून काय करणार?, असा सवाल राणेंनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. मागच्या एक वर्षात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काय काम केलं? कृषी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था कुठल्या क्षेत्रात काम केलं? फक्त पिंजऱ्यात बसतात आणि राम राम म्हणतात. म्हणूनच आमच्या राम कदमांना आंदोलन करावे लागत असल्याचा चिमटाही राणेंनी काढला.