मोफत उपचार मिळणार म्हणून भाजपच्या दिग्गज खासदारानं राजीनामा घेतला मागे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनसुखभाई वासवा (Mansukhbhai Vasava) यांनी भारतीय जनता पक्षाचा खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची बुधवारी त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे बैठक सुरू होती. यानंतर वासवा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

गांधीनगर येथे रूपाणी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वासवा म्हणाले, खासदार राहिलो तर माझ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर मला निशुल्क उपचार करता येतील, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं आहे. मी खासदार म्हणून राजीनामा दिल्यास मला उपचार घेणं शक्य होणार नाही. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते माझ्या वतीनं काम करतील अशी यंत्रणा तयार करण्यात येईल असा विश्वास मला पक्षातील नेत्यांनी दिला आहे आणि विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.

पुढं बोलताना ते म्हणाले, पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देण्याच्या निर्णयामागचे एकमेव कारण म्हणजे माझी तब्येत. मी आज मुख्यमंत्र्यांसोबत याबबत चर्चा केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार म्हणून मी माझ्या लोकांची सेवा करत राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.