‘भाजपा माझ्या बापाचा पक्ष, हा अहंकार नसून प्रेम’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – “भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष आहे. हा अहंकार नसून प्रेम आहे. त्याप्रमाणेच पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करणे कर्तव्य,” असे प्रतिपादन करुन भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उमेदवारीवरुन नाराजी आणि गटबाजीवर गुरुवारी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मी आलेली आहे, खूप कष्टाने वगैरे नाही, सातसमुद्र पार करुन आलेले नाही. आज विमानात जागा नव्हती, पूर्ण बुक होते. मग बोराळकरांसाठी एकजणाचे तिकीट कापले आणि आले. त्यापेक्षा काय संदेश द्यायचा आहे. आता जास्तीचे सांगायची गरज नाही, बंडखोरी झाली आहे, ती फक्त चर्चा आहे. कुणाचे नाव घेतले नाही, म्हणून आता माझ्यावर रागावू नका, जे काही रागवायचे ते उमेदवारावर रागवा, असेही त्यांनी म्हटले.

नाराजांची समजूत काढणार
तुम्हाला न विचारात घेता उमेदवार देण्यात आला, त्यावर तुम्ही नाराज आहेत का ? असे विचारले असता पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, नाराज असण्याचे कारण नाही. बोराळकर यांना पूर्वीही उमेदवारी देण्यात आली होती. मागीलवेळी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यात उदासीनता होती. कोअर कमिटीच्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. सामाजिक संतुलन पाहून उमेदवारी घोषित करण्यात आली. माझे समर्थक जे आहेत, ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत. बोराळकरांना विरोध, घुगेंना पाठिंबा, असे नाही. त्यांची समजूत काढेल. पोफळे यांना भेटेल. त्यामध्ये मला यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.