शिवसेनेला ‘धक्का’ देण्यासाठी भाजपची ‘मनसे’ च्या मोर्चाला ‘साथ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी मनसेकडून 9 फेब्रुवारी रोजी महामोर्चा कढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता भाजपही कामाला लागला असून मनसेच्या मोर्चात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता मनसेला मदत करणार असल्याचे बोललं जातंय.

मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार असून तसे आदेशच भाजप नत्यांकडून मुंबईतील कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या या मोर्चाला अधिक बळकटी यावी यासाठी भाजप नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या मोर्चात भाजप नेत्यांनी सहभागी व्हायचे की नाही हे अद्याप ठरलेले नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढणार असल्याचे 23 जानेवारी रोजी झालेल्या महाअधिवेशनात जाहीर केले होते. त्यानुसार मनसेचा हा मोर्चा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी हा मोर्चा मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत निघणार होता. मात्र, मुंबई पोलिसांनी या मार्गावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने आता नव्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.