भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’ महामंडळावरील नियुक्ती रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सरकारच्या काळातील विविध महामंडळांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याची कर्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदावरील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने मंगळवारी (दि.7) तसा आदेश काढला आहे.

महाराष्ट्रात मागील पाच वर्षे युतीचे सरकार होते. सत्तेत ज्याचे सरकार असते त्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांची महामंडळांवर वर्णी लावण्यात येते. मात्र, युतीच्या काळात पहिल्या साडेतीन वर्षे काहीच हालचाली झाल्या नाहीत. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामंडळांवर शिवसेना व भाजपच्या लोकप्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती बदलली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आधीच्या सरकारने केलेल्या महामंडळांवरील नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सिडको हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाते. या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची 4 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. नगरविकास विभागाच्या मंगळवारच्या आदेशाने ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे इतरही महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/