एकनाथ खडसेंसोबत आता राष्ट्रवादीमध्ये मोठं ‘इनकमिंग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या स्थापनेपासून गेली चार दशके कार्यरत राहिलेले उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाला सोडचिट्टी दिली. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी मुलगी रोहिणी खडसे या देखील मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

खडसे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. धुळे शहादा कलाकुवा अकोला येथील माजी आमदार यांचा स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. तर भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे त्यांच्या पत्नी आणि दोन माजी आमदार आज एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. भाजपचे जळगाव जिल्हा चे माजी अध्यक्ष यांचा देखील आज राष्ट्रवादीत प्रवेश असणार आहे. तद्वतच, मुक्ताईनगर पालिका आणि बोदवड नगर पालिकेतही आज अनेक जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, एकेकाळचे भाजपचे कार्यकर्ते आणि सध्या अमळनेर विधानसभा राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईड्स पाटील यांनी खडसे यांचे पक्षात स्वागत केले आहे. खडसेंनी भाजप सोडल्याने काय होते हे लवकरच कळेल, असा इशारा त्यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे. त्याचप्रमाणे खडसे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीत धुसफूस सुरु होते का ? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

You might also like