मतदान संपताच भाजपचे ‘कॉलसेंटर’ बंद ; १ हजारांहून अधिक तरुणांवर बेरोजगारीची ‘कुऱ्हाड’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी सुरु करण्यात आलेले कॉल सेंटर मतदान संपताच बंद करण्यात आल्याने एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. तुर्भे येथील एव्हरेस्ट निवारा या इन्फोटेक पार्क च्या इमारतीमध्ये मागील सहा महिन्यांपासून हे कॉल सेंटर सुरु होते.

भापजच्या प्रचारासाठी चालविले जात असलेले हे कॉल सेंटर रातोरात बंद करण्यात आले आहे. नोएडा येथील व्हिएज इंडिया या कंपनीमार्फत तुर्भे इंदिरानगर येथील एव्हरेस्ट निवारा इन्फोटेक पार्क इमारतीमध्ये हे कॉलसेंटर चालविले जात होते. मुंबईतील एका प्लेसमेंटमार्फत कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली होती. त्यांना डेटा इंट्रीचे काम असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराविषयी त्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे एक हजार कर्मचाऱ्याकडून राज्याच्या विविध भागांमील मतदारांना फोन करुन नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला जिंकून द्या असा संदेश दिला जात होता. काही कामगारांकडून मुंबईच्या काही भागात प्रत्यक्ष फिरुन राजकीय सर्व्हेही करुन घेण्यात आला होता.
लोकसभेचा शेवटचा टप्पा संपताच २० मे रोजी कर्मचाऱ्याना अचानक २० दिवसांची सुट्टी देण्यात आली. त्याच रात्री ज्या कामासाठी कॉलसेंटर सुरु केले होते, ते काम संपल्याने कॉलसेंटर बंद झाल्याचे ई मेल द्वारे कळविण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यानी कॉलसेंटरबाहेर गर्दी केली होती. हे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेतली.

तुर्भे पोलिसांनी सांगितले की, व्हिजन इंडियामार्फत चालणारे कॉलसेंटर अचानक बंद झाल्याच्या कारणावरुन कामगारांनी जमाव जमविला होता. तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करुन प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. काम संपल्याने कामगारांना कमी केल्याचे व्हिजन इंडियाचे प्रदीप वाणी यांनी सांगितले. याबाबत कर्मचाऱ्याना अगोदरच कल्पना दिली असल्याचे त्यांचे म्हणणे होते, असे पोलिसांनी सांगितले.

You might also like