‘त्या’ प्रकल्पामध्ये भाजपचे आ. टिळेकर यांचे कार्यालयीन संपर्क प्रमुख भागीदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्यावरील आरोपांची मालिका थांबता थांबेना. रामटेकडी येथील भुमी ग्रीन एनर्जी या कचर्‍यापासून खतनिर्मितीच्या प्रकल्पामध्ये भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालयीन संपर्क प्रमुख आनंद देशमुख हे भागीदार आहेत. तसेच आमदारांकडे असलेली एम. एच. १२ एन.सी. ७८ ही मोटार भुमी ग्रीन एनर्जीचे संचालक विजय टिळेकर यांनी खरेदी केली आहे. देशमुख हा मोहरा असून आमदार टिळेकरच कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे करताधरता असल्याचा आरोप करत  देशमुख याच्या हडपसर येथील कॅनरा बँक खात्यांची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत करत नवा धमाका केला आहे.

पुणे महापालिका भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, की डिसेंबर २०१५ मध्ये अजिंक्य बायोफोर्ट या कंपनीने त्यांचा रामटेकडी येथील कचर्‍यापासून  खत तयार करण्याचा प्रकल्प भुमी ग्रीन एनर्जी कंपनीला हस्तांतरीत करण्यात आला. यानंतर दुसर्‍याच दिवशी भुमी ग्रीन एनर्जीने तीन संचालकांचे भागीदार पत्र तयार केले. त्यामध्ये विजय टिळेकर, पंकज पासलकर आणि आनंद सुरेश देशमुख हे तिघे समान हक्काचे संचालक आहेत. भुमी ग्रीन कंपनीच्यावतीने हडपसर आणि वडगाव बुद्रुक येथे चालणार्‍या प्रकल्पातील कामापोटी १० कोटी ५० लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. आनंद देशमुख हे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालय संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे आनंद देशमुख व भुमी ग्रीन एनर्जी यांच्या हडपसर मगरपट्टा कॅनरा बँक शाखेतील खात्यावरून होणार्‍या सर्व रकमांचे व्यवहार तपासण्यात यावेत.

जाहिरात

तसेच आमदार  योगेश टिळेकर हे मागील दोन वर्षांपासून वापरत असलेली एनोव्हा क्रिस्टा ही गाडी २६ मे २०१६ रोजी भुमि ग्रीन एनर्जीचे संचालक विजय टिळेकर यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. या गाडीवर भाजप युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष आमदार योगेश टिळेकर अशी नेमप्लेटही लावण्यात आली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी भुमी ग्रीन या कंपनीस रामटेकडी आणि वडगाव बुद्रुक येथील प्रकल्पांचे काम घेउन दिले आहे. त्या बदल्यात भुमि ग्रीन कंपनीने त्यांना सुमारे २६ लाख रुपये किंमतीची मोटार भेट दिली. येवलेवाडी विकास आराखड्यातील आरक्षण उठविण्याच्या बदल्यात आमदार योगेश टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायीकाकडून मर्सिडीज बेंज ही साधारण एक कोटी रुपये किंमतीची  गाडी घेतल्याचे प्रकरण मी २७ ऑगस्टला उघडकीस आणले. त्यानंतर आमदार टिळेकर यांनी भुमि ग्रीन कंपनीकडील इनोव्हा क्रिस्टा मोटार परत विजय टिळेकर यांच्याकडे सोपविली. भुमि ग्रीन कंपनीने १ सप्टेंबरला या गाडीचे सुमारे ९ लाखांचे कर्ज एकरकमी फेडले. यानंतर कागदपत्रांचे सोपस्कार पुर्ण करत ही गाडी आमदार टिळेकर यांचे धाकटे बंधू चेतन टिळेकर यांच्या नावे करण्यात आली आहे. याचे सर्व कागदोपत्री छायाचित्र आणि फेसबुकवरील छायाचित्रांच्या प्रतिही वसंत मोरे यांनी यावेळी पत्रकारांना दाखविल्या.

जमीन घोटाळे, केबल व्यावसायीकांकडून खंडण्या गोळा करणारे आमदार योगेश टिळेकर हे कचर्‍यासाठीही पैसे खात असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. यामुळेच हडपसरच्या नागरिकांच्या विरोधानंतरही मागील काही वर्षात शहरातील बहुतांश मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प हडपसर परिसरात सुरू झाले आहेत. पैसे खाण्यासाठी संपुर्ण हडपसर मतदार संघाचा कचरा डेपो करणार्‍या आमदारांच्या व्यवहारांची चौकशी करावी , असे आव्हान वसंत मोरे यांनी भाजपच्या नेत्यांना यावेळी दिले.

जाहिरात