मोबाईलवर बोलताय काळजी घ्या ; वरिष्ठ नेत्यांबद्दल ‘वाढीव’ काॅमेंट केल्याने भाजपाचे ‘हे’ २ पदाधिकारी ‘निलंबित’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलवर बोलताना अनेक जण दुसऱ्याकडे आपल्या मनातील जळजळ व्यक्त करताना वेड्या वाकड्या शब्दांचा वापर करतात. आता मात्र, दोघांमधील बोलणे हे दोघांमधील राहिले नसून ते कधीही सार्वजनिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईलवर बोलतानाही काळजी घ्या. विशेषत: राजकीय नेत्यांनी आपल्या वरिष्ठांविषयी चुकूनही अपशब्दाचा वापर करु नये, असा संदेश नागपूरमधून भाजपाने दिला आहे. भाजपाने आपल्या वरिष्ठ नेत्यांविषयी अपशब्द बोलणाऱ्या दोघांना पक्ष विरोधी कार्य करीत असल्याचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे.

भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह आणि अभय तिडके अशी या दोन पदाधिकाऱ्याची नावे आहेत. जयहरी सिंह हे संजय गांधी निराधार योजेनेचे (पश्चिम नागपूर) अध्यक्ष आहेत तर, तिडके हे नियुक्त सदस्य आहेत. या दोघांना केवळ निलंबित करण्यात आले नसून त्यांना संजय गांधी निराधार योजनेतूनही बरखास्त करण्याची शिफारस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

या सर्व कारवाईला कारणीभूत ठरली तरी जयहरी सिंह आणि तिडके यांच्यातील फोनवरील चर्चेचा आडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी पक्षाच्या मंडळ अध्यक्षांपासून आमदार तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्दांचा वापर करीत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. हा ऑडिओ पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहचल्यावर शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी दोघांकडे खुलासा मागितला. त्यांचा खुलासा न पटल्याने दोघांनाही पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दोघांपैकी कोणीतरी हे संभाषण दुसऱ्याला पाठविले व त्यांनी ते व्हायरल केले. दुसऱ्याला दोष देताना त्याचा फटका हे संभाषण व्हायरल करणाऱ्यालाही बसला आहे.

You might also like