Coronavirus : मुख्यमंत्री ठाकरेंचं निवासस्थान असलेला ‘मातोश्री’चा परिसर BMC कडून सील ; पोलीस, महापालिकेचे अधिकारी दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील कोरोनाचा प्रकोप वाढतो. अनेक परिसर देखील सील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या आसपासचा परिसर देखील बीएमसीएकडून आज तातडीने सील करण्यात आले आहे. कलानगरमध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृती बिघडल्याने बीएमसीने खबरदारी घेतली आहे. ही टपरी मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर आहे. या संपूर्ण भागात आता प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोरोचा प्रसार वाढत असल्याचे दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाहन चालकाला देखील सुट्टी दिली होती. ते स्वत: कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी याआधीच बंद केल्या असून फक्त महत्वाच्या बैठकांना ते उपस्थिती लावत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे.

लॉकडाऊन दरम्यान कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 693 कोरोनाग्रस्त आढळले. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 24 तासातील 32 कोरोनाग्रस्तांच्या बळीमुळे देशात आता मृतांचा आकडा 109 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसतो. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दल बोलताना अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजना करायची यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करुन घ्यायचे याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी पाहिली तर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला या व्हायरसचा जास्त धोका आहे असे स्पष्ट आहे. भारतात 63 टक्के कोरोनाबळींचे वय 60 पेक्षा अधिक होते. परंतु त्या खालोखाल 40 ते 60 वयोगटालाही मोठा धोका आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन दिसते. 30 टक्के मृत्यू या वयोगटातल्या कोरोनाग्रस्तांचे झाले आहेत. 86 टक्के लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसबरोबर इतर कुठला मोठा आजार असल्यामुळे झाला आहे असेही आकडेवारी देत मंत्रालयाने स्पष्ट केले.