नेपाळमध्ये आढळलेल्या 8 पर्यटकांचे मृतदेह उद्या भारतात आणणार, 4 लहान मुलांचा समावेश

काठमांडू : वृत्तसंस्था – नेपाळच्या दमन येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या 8 पर्यटकांचे एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी एव्हरेस्ट पॅनोरमा रिसॉर्टमध्ये घडली होती. हा रिसॉर्ट मकवापूर जिल्ह्यातील दमन येथे असून या पर्यटकांचा मृत्यू खोलीतील गॅस हिटर वापरल्यानंतर गुदमरल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन दांपत्यासह चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण केरळ येथील असून 15 जणांचा ग्रुप नेपाळ येथे गेला होता. या सर्वांचे आज शवविच्छदन करण्यात आले असून उद्या त्यांचे मृतदेह भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने दिली.

सुट्टीसाठी गेलेले हे पर्यटक भारतात परतत असताना सोमवारी मकवापूर जिल्ह्यातील दमन येथील रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. रिसॉर्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व पर्यटक एका खोलीत मुक्कामी थांबले होते. जास्त थंडी असल्याने त्यांनी गॅस हिटर सुरु केले. पोलीस अधीक्षक सुशील सिंह राठोड यांनी सांगितले की, रिसॉर्टच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत हे भारतीय पर्यटक आढळून आले. त्यांना तात्काळ एचएएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती राठोड यांनी दिली.

काठमांडू येथील भारतीय दूतावासातील सुत्रांनी सांगितले की, आठ लोकांना विमानाने काठमांडू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय दूतावसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, काठमांडू येथील टीचिंग रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह गुरुवारी सकाळी भारतात पाठवले जाणार आहेत. तसेच मृत झालेल्या व्यक्तींसोबत आलेल्या इतर सात जणांपैकी पाच जणांना भारतात पाठवण्यात आले असून दोघांना मृतदेहांजवळ थांबवण्यात आले आहे.
मृतांमध्ये प्रविण कृष्णन नायर, सरन्यासी, श्रीभद्र प्रवीण, आरचा प्रवीण, अभिनव सरन्या नायर, रंजीत कुमार आदथोलथ पुनाथिल, इंदू लक्ष्मी, पीताम्बरन रागलाथा आणि वैष्णव रंजीथ अशी मृतांची नावे आहेत. प्रविण नायर हे इंजीनिअरींग कॉलेजमध्ये सहशिक्षक आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –