ऋषी कपूर यांनी सांगितला दाऊदच्या भेटीचा किस्सा, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दुबईत दाऊदसोबत भेट झाल्याची स्वत: कबुली दिली होती. ही भेट 1988 मध्ये झाली होती. ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केला आहे.

ऋषी कपूर यांनी सांगितले की, मी एका कार्यक्रमासाठी दुबईत गेलो होतो. या कार्यक्रमात आरडी बर्मन आणि आशा भोसलेदेखील सहभागी होत्या. विमानतळावर उतरताच एका व्यक्तीने माझ्याकडे फोन सोपवला आणि सांगितले की भाई तुमच्याशी बोलणार आहे. मला वाटले कोणीतरी चाहता असेल. बोलल्यावर लक्षात आले की दाऊद इब्राहिम बोलत आहे. त्याने सांगितले की मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यावर मी त्याला हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करतो आणि मग कळवतो असे सांगितले.

मी दाऊदच्या घरी गेलो होतो. तेव्हा दाऊदला फक्त एक गँगस्टर म्हणून ओळखले जात होते. त्याने माझा चांगला पाहुणचार करत खूप स्तुती केली. एका चित्रपटात माझे नाव दाऊद होते या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला होता. असे त्याने सांगितले. जवळपास चार तास ही भेट सुरु होती, असेही ऋषी कपूर यांनी सांगितले होते. यानंतर मात्र आपली आणि दाऊदची भेट झाली नाही.