विजय माल्ल्याचा बंगला खरेदी करणार्‍या बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला ED कडून अटक, 18 तास चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) अटक करण्यात आली आहे. सचिन जोशी याची ईडीने तब्बल 18 तास चौकशी केली. चौकशीनंतर अटक करण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार ओमकार रिॲल्टर्स प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशी कडून 100 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने सचिन जोशीवर कारवाई केली आहे.

रेस्ताराँ आणि प्लेबॉय फ्रॅचाईजीचा मालक
सचिन जोशी याने विजय माल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर व्हिला खरेदी केला आहे. तसेच इतर अनेक शहरांमध्ये असलेल्या रेस्ताराँ आणि क्लब असणाऱ्या प्लेबॉय फ्रॅचाईजीचा तो मालक आहे. ओमकार रिॲल्टर्स आणि सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र, सचिन जोशी ईडी समोर चौकशीसाठी हजर झाला नाही. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आले.

खाद्य परफ्यूमची निर्मिती करणे मुख्य व्यवसाय
सचिन जोशी याने मॉडेल उर्वशी हिच्यासोबत लग्न केले असून त्याने तेलगू, कन्नड तसेच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. सचिन जोशी याचा मुख्य व्यवसाय हा पान मसालामध्ये वापरण्यात येणाऱ्या खाद्य परफ्यूमची निर्मिती करणे हा आहे. हा व्यवसाय जे एम जोशी ग्रुपच्या माध्यमातून चालवला जातो. याशिवाय रेस्तराँ आणि मद्य व्यवसायही या ग्रुपकडून केला जातो.

माल्ल्याचा बंगला 73 कोटींना खरेदी
सचिन जोशी याने भारतात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेल्या विजय माल्ल्याचा गोव्यातील बंगला 73 कोटी रुपयांना खरेदी केला होता. विजय माल्ल्या 2017 मध्ये भारतातून फरार झाल्यानंतर त्याच्या गोव्यातील बंगल्याची विक्री करण्यात आली होती. आयकर विभागाने मागील आठवड्यात सचिन जोशी याच्या घरावर आणि कार्यालायावर छापा टाकला होता. जवळपास तीन ते चार तास अधिकाऱ्यांकडून तपास सुरु होता.

ईडीने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विका प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.