अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाणार !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (संजूबाबा) ला कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती देताना सांगितले की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान त्याची प्रकृती वेगाने सुधरावी, यासाठी आपण प्रार्थना करुयात.

काही दिवसांपूर्वीच श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे संजय दत्तला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्टही करण्यात आली. जी नेगेटिव्ह आली. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

यानंतर आज संजय दत्तने आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट केले, ज्यात त्याने म्हटले की, मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी सध्या मी नेहमीच्या कामातून लहानशी सुट्टी घेत आहे. यावेळी माझे कुटुंब आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमचे प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन. दरम्यान, आपल्या पुढील उपचारांसाठी संजय दत्त अमेरिकेत जाणार असल्याचे समजते.