Coronavirus : ममता बॅनर्जी यांच्या अधिकार्‍याचा मुलगा ‘कोरोना’ग्रस्त, तरीदेखील 3 दिवस घेतल्या अनेकांच्या ‘भेटीगाठी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पश्चिम बंगालमध्येही कोरोना व्हायसने थैमान घातले आहे. एका अधिकार्‍याच्या मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मात्र, संबंधित मुलाने कोरोना चाचणीला नकार देउन तीन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज झाल्या असून मुलाला तपासणी न करताच सोडल्याने अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले आहेत.
देशातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहचली आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून कोरोनाने हळूहळू पाय रोवले आहेत.

देशातील 16 राज्यांमध्ये पसरलेला कोरोना आता पश्चिम बंगालमध्येही पोहचला आहे. ब्रिटनवरुन आलेल्या 18 वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह होता. संबंधित मुलगा गृहविभागाच्या अधिकार्‍याचा मुलगा असून लंडनवरुन आल्यानंतर त्याने कोरोना चाचणीला नकार दिला होता. त्यानंतर तो अनेकांना भेटल्याचेही बोलले जात आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली नाही. कोणीही व्हीआयपी किंवा एलआयपी नाही, सर्व सारखेच असून त्यामुळे सर्वांनीच नियम पाळले पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणारा हा विद्यार्थी यूकेहून 15 मार्चला कोलकाताला परतला होता.

विमानतळावरील अधिकार्‍यांनी त्याला बेलेघाटा आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला नकार देत मुलगा घरी गेला. लंडनमधील ज्या तीन लोकांसोबत त्याने रुम शेअर केली होती. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. यानंतरही त्याने लोकांमध्ये मिसळणं सुरुच ठेवलं. अधिकारी असलेल्या आपल्या आईला तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या नबन्ना येथे भेटला. तर, 16 मार्चला शहराच्या मध्यभागी असलेल्या एमआर बांगूर हॉस्पिटलला त्याने भेट दिली. तिथे त्याने अधिकार्‍यांची भेट घेतली. पण हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्यास नकार दिला.

राज्य आरोग्य विभागाने अखेर त्याला 17 मार्चला बेलेघाटा आयडी रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडले. तिथं त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याचा चालक आणि कुटुंबाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करीत मुलाला अ‍ॅडमिट न केल्याने प्रशासनालाही चांगलेच फटकारले आहे. एवढी व्यवस्था असताना एखादी व्यक्ती तुमच्या हातून सुटणे हा बेजबाबदारपणा असल्याचे त्या म्हणल्या. हात जोडून विनंती करते, सर्वांना घटनेचे गांभीर्य पाहून वागा, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.