Sorry ! काही लोक मरणारच, म्हणून देश बंद करायचा का ?’, ‘या’ देशाच्या राष्ट्रध्यक्षांचे धक्कादायक विधान

रिओ दि जानिरो/ ब्राझील : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील 175 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे तर हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फटका विकसनशील देशांना देखील बसला आहे. ब्राझील हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. जागतिक संकटाच्या काळात देखील ब्राझीलमध्ये रजकारणाची चिखलफेक होताना पहायला मिळत आहेत. त्यात आता थेट राष्ट्राध्यक्ष विरुद्ध प्रांतांचे गर्व्हर्नर यांच्यात सामना रंगला आहे.

लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून आपल्या देशाला उत्पादनं बंद करणं परवडणार नाही. आता काही लोक मरणारच, त्याबद्दल दु:ख आहे. पण गाडीचे अपघात होतात म्हणून आपण कार फॅक्टरी बंद करू शकत नाही, असं धक्कादायक विधान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी केले आहे. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये कोरोना व्हयरसची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली असून हाच प्रांत ब्राझीलचं आर्थिक केंद्र आहे.

शुक्रवारी ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3417 वर पोहचली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे 82 लोकांचा जीव गेला आहे. या आकड्यांच्या सत्यतेबद्दल राष्ट्राध्यक्षांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही जण परिस्थितीचा फायदा उठवत राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ब्राझीलमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर 26 प्रांताच्या गर्व्हर्नरनी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करत असल्याचे जाहीर केले आहे. लॉकडाऊनला राष्ट्राध्यक्षांचाच विरोध आहे.

साओ पावलोमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आणि सर्वाधिक मृत्यू याच राज्यात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर साओ पावलोचे गर्व्हर्नर जाआओ डोरिया यांनी लॉकडाऊन जाहीर केला. डोरिया हे पूर्वी बोल्सोनारो यांच्याबरोबर होते. पण आता ते बोल्सोनारो यांचे राजकीय विरोधक मानले जातात. डोरिया यांच्या निर्णयाला राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचा विरोध आहे. डोरिया हे परिस्थितीचा फायदा उचलून देशाला नुकसान पोहचवत असल्याचे बोल्सोराने यांचे म्हणणे आहे. एककीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडला असताना ब्राझीलमध्ये गलिच्छ राजकारण पहायला मिळत आहे.