दिल्ली लॉकडाउन : CAA च्या विरोधातील शाहीन बाग मधील 101 दिवसापासून चालू असलेलं आंदोलन ‘बंद’, पोलिसांनी खाली केलं ‘ठिकाण’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सीएए आणि एनआरसी विरोधात शाहीनबाग येथे गेले १०१ दिवस सुरु असलेले आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन समाप्त केले.  कोरोना विषाणूचा वाढता फैलाव सुरु झाल्याने देशातील अनेक राज्यांनी संचारबंदी जाहीर केली आहे. दिल्लीतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चारपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. कोरोना विषाणूची लागण येथे होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता.

गेली १०० दिवस हे आंदोलन सुरु होते. मात्र, देशात जसा कोरोनाचा फैलाव होऊ लागला, तसा येथील आंदोलकांची संख्या कमी होत गेली. त्यांच्या दोन गट पडले. त्यातील एका गटाने आंदोलन मागे घेण्याची मागणी केली होती. गेल्या दोन तीन दिवसांपासून येथे केवळ ५ महिला आंदोलनासाठी बसल्या होत्या.
मंगळवारी सकाळी आंदोलनाच्या १०१ व्या दिवशी शेवटी पोलिसांनी या पाचही महिलांना ताब्यात घेतले. येथील सर्व तंबू आणि इतर साहित्य काढून टाकले व गेली १०१ दिवस बंद असलेले रस्तेही मोकळे केले.
शाहीनबाग येथील आंदोलन देशभर गाजले. याच काळात दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यात हा मुद्दा गाजला होता.

या आंदोलनाच्या काळात येथे दोनदा गोळीबाराच्या घटनाही घडल्या होत्या. या आंदोलन काळात येथे देशविरोधी घोषणा दिल्यावरुन काही जणांवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दशकात रस्त्यावर इतके दिवस सुरु असलेले हे आंदोलन ठरले आहे.