ठाकरे सरकार ST सेवेबाबतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लावत मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आंतरराज्यीय वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाची गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा आदी राज्यात आंतरराज्य प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक यापूर्वीच बंद केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोरोनाला रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, याबाबतच्या कोणत्याही निर्णयाची राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यभरात निर्बंध लादले आहेत. मात्र सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.