Budget 2021 : निर्मला सीतारामन यांची घोषणा ! नाशिक मेट्रोसाठी हजारो कोटी, नागपूरमध्येही ‘मेट्रो फेज टू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) केली आहे. निर्मला यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचे काम करण्याच्या दृष्टीने किती निधी दिला जाणार आहे, याची माहिती दिली. त्यात महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच जाळ उभारण्यासाठी 5 हजार 900 कोटी रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले. तर नाशिकमध्येही मेट्रो येणार असून त्यासाठी 2 हजार 92 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे.नाशिक मेट्रोसाठी केंद्राने असाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेत सोमवारी सादर केला. यावेळी सीतारामन यांनी भांडवली गुंतवणूक वाढवून 5.54 लाख कोटी रुपयांची केल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भविष्यात देशात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली. दक्षिण भारतात बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांनाही मेट्रोची सेवा उभारण्यासाठी मोठा निधी दिला आहे. बंगळुरुमधील मेट्रोचा विस्तारासाठी 14 हजार 788 कोटींची घोषणा केली आहे. तसेच चेन्नईतही मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाचं काम केले जात असून हा मार्ग 118.9 किलोमीटरचा असणार आहे. यासाठी 63 हजार 240 रुपयांचा निधी दिला आहे.