Budget 2021 : रेल्वे अन् मेट्रोबाबत मोठी घोषणा ! महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत, यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 पूर्णपणे तयार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी 1.10 लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेसोबत सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी रेल्वे शिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 18 हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर खीच करण्यात येणार आहे. मेट्रोचं जाळ शहरात पसरवण्यावर जोर दिला जाणार आहे. यात कोच्ची, बंगळुरू, चेन्नई यांच्यासह महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा आज करण्यात आली.

अर्थसंकल्पात हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी 1.03 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये इकॉनोमिक कॉरिडोर बनवला जाईल, केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जातील, मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकता-सिलीगुडी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. तसेच आसाममध्ये पुढील तीन वर्षात हायवे आणि इकॉनोमिक कॉरिडोर बनवण्याची घोषणा करण्यात आली.